सिल्लोड, (प्रतिनिधी) : तालुक्यातील मंजूर एमआयडीसी प्रकल्पाबाबत आज मुंबई येथे राज्याचे उद्योग मंत्री उदय सामंत यांच्या अध्यक्षतेखाली महत्त्वपूर्ण बैठक पार पडली.
या बैठकीस आमदार अब्दुल सत्तार यांची प्रमुख उपस्थिती होती. बैठकीत सिल्लोड तालुक्यातील मंजूर एमआयडीसी संदर्भात मोठा निर्णय घेण्यात आला असून मंगरूळ, मोढा शिवारातील खाजगी जमिनी वगळून पूर्वी प्रस्तावित असलेल्या खडकाळ मुरमाड शासकीय जागेवर एमआयडीसीला पूर्ववत मंजुरी देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
या निर्णयामुळे अनेक दिवसांपासून प्रलंबित असलेल्या एमआयडीसी प्रकल्पाचा मार्ग मोकळा झाला असून पहिल्या टप्प्यातील कामांना तातडीने सुरुवात करण्याचे निर्देशही बैठकीत देण्यात आले. त्यामुळे सिल्लोड तालुक्यात औद्योगिक विकासाला गती मिळणार आहे. तसेच बैठकीदरम्यान तालुक्यातील गेवराई शेमी ते अंधारी परिसरातील शेतकऱ्यांनी सहमती दर्शवल्यास दुसऱ्या टप्प्यात येथे एमआयडीसी उभारण्याचे काम त्या भागात सुरू करण्याबाबतही सकारात्मक चर्चा करण्यात आली.
-- दूरदृश्य प्रणालीद्वारे उपस्थिती --
या बैठकीस या बैठकीस महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाच्या सह मुख्य कार्यकारी अधिकारी वर्षा ठाकुर (घुगे), उपसचिव श्रीकांत पुलकुंडवार, विवेक घोडके, उपमुख्य कार्यकारी अधिकारी, व्यवस्थापक सरोदे, क्षेत्र व्यवस्थापक, छ. संभाजीनगर गीते, भूमापक आरिफ पठाण यांची उपस्थिती होती. तर छत्रपती संभाजी नगरचे जिल्हाधिकारी विनय गौडा तसेच उपविभागीय अधिकारी लतीफ पठाण हे दूरदृश्य प्रणालीद्वारे सहभागी झाले होते.
-- शेतकऱ्यांचे हित लक्षात घेवून बैठकीत निर्णय --
शेतकऱ्यांना केंद्रबिंदू मानून शेतकऱ्यांचे हित लक्षात घेवून बैठकीत निर्णय घेण्यात आले. सिल्लोड तालुक्यातील एमआयडीसीसाठी एकही इंच शेतकऱ्याची जमीन जबरदस्तीने घेतली जाणार नाही. एमआयडीसी प्रकल्प हा शासकीय जमिनीवर उभारण्यात येणार असून शेतकऱ्यांच्या हिताला कुठलाही धक्का लागू दिला जाणार नाही. तसेच टप्पा क्रमांक २ अंतर्गत गेवराई शेमी ते अंधारी परिसरातील शेतकऱ्यांची पूर्वपरवानगी घेतल्याशिवाय कोणतीही जमीन संपादित केली जाणार नाही.
प्रशासन आणि शेतकरी यांच्यात समन्वय साधून पुढील प्रक्रिया राबविण्यात येणार असल्याची माहिती यावेळी देण्यात आली. सिल्लोड तालुका हा अवर्षणग्रस्त व आत्महत्याग्रस्त तालुका म्हणून ओळखला जातो.
शेतीवर अवलंबून असलेल्या हजारो युवकांना रोजगाराच्या मर्यादित संधी उपलब्ध असल्याने तालुक्यात औद्योगिक विकासाची मोठी गरज निर्माण झाली आहे. ही बाब लक्षात घेऊन आमदार अब्दुल सत्तार यांनी सातत्याने पाठपुरावा करत एमआयडीसीची मागणी शासन स्तरावर लावून धरली होती. एमआयडीसीमुळे सिल्लोड तालुक्यात उद्योगांना चालना मिळणार असून स्थानिक युवकांच्या हाताला रोजगार, व्यवसायांना संधी तसेच परिसराच्या आर्थिक विकासाला मोठी गती मिळेल.













